घाटमाथा या नांदगाव तालुक्यातील परिसरात शुक्रवारी २४ जून ला मुसळधार पाऊस पडला. दरम्यान शेतातून बैलगाडीने घरी परतणाऱ्या एक शेतमजूर महिला आणि दोन चुलतबहिणी जातेगाव परिसरातील खारी नदी पार करीत असताना बैलगाडी उलटल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील शेतमजूर महिलेसह एका मुलीचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या एका मुलीचे शोधकार्य सुरू आहे. सदर दुर्घटनेमुळे घाटमाथा परिसरात शोककळा पसरली आहे.
अचानक मुसळधार पाऊस आल्याने
नांदगाव तालुक्यातील जातेगाव परिसरात महादेव डोंगर व आडगांव परिसरात दुपारी शेतकरी व शेतमजूर शेतीची कामे करून घराच्या दीशेने परतत होती. खारी नदीच्या मार्गातून घरी जात असताना मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि आडगांव येथील शेतमजूरांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची बैलगाडी पाण्यात उलटली. या पाण्याच्या प्रवाहात सापडलेल्या पाच शेतमजूरांची पाण्यातून कशीबशी सुटका झाली परंतु सौ.मिनाबाई दिलीप बहिरव (वय ४५),कु.साक्षी अनिल सोनवणे (वय ११) व कु. पूजा दिनकर सोनवणे (वय १५) सर्व रा. आडगांव ता. कन्नड जि. औरंगाबाद या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. त्यांना पाण्याच्या प्रवाहात वाहून जातांना वाचविण्याचा काहींनी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्या हाती लागू शकल्या नाही. सदर घटनेची वार्ता परिसरात पसरली. यावेळी पोलिस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. शोधकार्य सुरू केले असता सौ.मिनाबाई दिलीप बहिरव व कु.साक्षी अनिल सोनवणे यांचा मृतदेह पोलिस प्रशासन व नागरिकांच्या अथक प्रयत्नांतून शोधून काढण्यात यश आले. तर पूजा दिनकर सोनवणे हिचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.