राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. मुंबईतही शुक्रवारी सहा महिन्यातील रूग्णांनी सर्वात मोठा आकडा गाठलेला आहे. शुक्रवारी राज्यात १५,८१७ रुग्ण वाढले आहेत तर ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या १५०० हून अधिक आहे. नागपुरातही रुग्णांची संख्या तब्बल २००० च्या पार गेली आहे. पुणे शहर आणि ग्रामीण मिळून २३४३ कोरोना रुग्ण वाढले आहेत तर नाशिक जिल्ह्यात आज ११३५ नवे रुग्ण आणि ८ जणांचा मृत्यू झालाय.
त्यामुळे नागपुर, नाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन करण्यात आलाय.
नागपूर- नागपुरात आज वीकेंड लॉकडाऊन आहे. तर १५ मार्चपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
औरंगाबाद- उद्या औरंगाबाद जिल्हा संपूर्ण लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहतील.
नाशिक- जीवनावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील दारू दुकानांसह सर्व दुकाने शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहेत. यासोबतच शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात येणार आहे.
धुळे – एकीकडे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, रविवार पासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला असतांना नागरिकांमध्ये मात्र निष्काळजीपणा अजूनही दिसून येतो.
पिपंरी – पिपंरी चिंचवडने स्वतंत्रपणे नवी नियमावली जाहीर केली आहे. दुकानांमध्ये आणि भाजी मंडईत गर्दी न करण्याचे आदेश आहेत.
परभणी- कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून परभणी जिल्ह्यात कालपासून दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊनची घोषणा
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मीरा- भाईंदर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मीरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या भागात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मीरा- भाईंदर क्षेत्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. १३ ते ३१ मार्च मध्यरात्री १२ पर्यंत हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान मीरा भाईंदर हॉटस्पॉट क्षेत्राबाहेरील सर्व हॉटेल, बार, बँक्वेट हॉल आणि फूड कोर्ट ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सर्व दुकाने सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत ३० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.शुक्रवारी मीरा- भाईंदर क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. आतापर्यंत मीरा भाईंदर क्षेत्रातील २७,७९७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यापैकी २६,१९९ रुग्ण बरे झाले असून ७९२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून नये, असं आवाहनही करण्यात आले आहे.