मुंबई : कोरोनामुळे मुंबईसह राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम अजूनही पूर्ण झालेला नाही.अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यावर उपाय म्हणून सरकारने दोन्ही परीक्षांचा ५० टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित ५० मूल्यमापन पद्धतीचा वापर करून परीक्षा घ्याव्यात
अशा मागणीसाठी आज राज्यभरातील शिक्षकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन अभ्यासक्रम अर्धवट राहीला आहे त्या संदर्भातील वस्तुस्थिती आणि संपूर्ण माहिती दिली. तसेच जे अंतर्गत आणि प्रात्यक्षिक आदींसाठी गुण दिले जातात, त्यासाठीही वेगळा विचार करून त्यात बदल करावा अशी मागणीही करण्यात आली.
राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोरोना या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम अर्धवट राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना अंतर्गत गुण सरसकट द्यावेत आणि प्रात्यक्षिक परीक्षा न घेता त्यासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने काही लिखित परीक्षा घ्याव्यात अथवा ते रद्द करावेत, असा पर्यायही शिक्षकांनी सुचवला असल्याची माहिती देण्यात आली.