कोरोना कालावधीत पालिकेला सहकार्य करणाऱ्या हॉटेल्स, जाहिरात कंपन्या आदींना पालिकेने काही प्रमाणात सवलती दिल्या आहे. त्यावर खूपच आक्षेप घेण्यात आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेने ज्यांना ज्या काही आर्थिक सवलती दिल्या आहेत, त्या मार्चनंतर बंद करण्यात येतील, असे यंदाच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले आहे. शिवाय जुन्याच विकास कामांना पहीले प्राधान्य देण्यात येणार असून नवीन कामांना त्यानंतरच हात लावण्यात येणार असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिका लवकरच कर्जरोखे उभारणार असल्याचे महापौर पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते परंतु आता
मुंबई महापालिका प्रशासन कर्ज रोखे काढत आहे अथवा नाही हे अजूनतरी आपल्याला माहिती नाही.तसेच, आमच्या समोर तसा प्रस्तावही आलेला नाही, असे स्पष्ट करीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी कानावर हात ठेवले आहेत. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, जर महापौरांनी कर्ज रोख्यांसंदर्भात काही वक्तव्य केले असेल तर त्यांना सर्वपक्षीय नगरसेवक, गटनेते विचारणा करू शकतात, असे म्हटले होते.
परंतु आता महापौरांनी, कर्जरोखे प्रकरणात आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले असल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने खर्च खूप झाला आहे हे खरे असले तरी पालिका ढबघाईला आलेली नाही, असा दावा महापौर पेडणेकर यांनी केला आहे. मुंबई महापालिकेकडे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी विविध बँकांत असून त्यात चांगलीच वाढ होत आहे. मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ज्या सुविधा दिल्या तशा जगात कुणीही दिल्या नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणात महापालिकेने खर्च केला. सीएसआर फंडातूनही काही प्रमाणात खर्च केला आहे, असेही महापौरांनी म्हटले आहे. मात्र नवीन सवलती देऊन भुर्दंड वाढवला जाणार नाही. हा अर्थसंकल्प बजेट मुंबईकरांसाठी सुखकारक असेल, असेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.