कोल्हापूर – कुक्कूट पालन व्यावसायीक चिकन विक्रेते, हॉटेल व्यवसायिक व नागरीक यांनी बर्ड फ्ल्यू संबंधी राज्यातील परीस्थिती लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक व नियंत्रण आणण्यासाठी खबरदारी/दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.
महापालिकेच्या परवानगी शिवाय महापालिका क्षेत्रात पक्षी आणू नये. बर्ड फ्ल्यू हा विषाणू स्थलांतरीत पक्षांमधून पसरतो. त्यामुळे संक्रमित ठिकाणांवरून पक्षी आणणे, वाहतूक करण्याची दक्षता घ्यावी. तसेच मनपा क्षेत्रामध्ये पक्षी आणण्यापूर्वी परवानगी घेण्यात यावी. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांडयात त्यांना रोज खाद्य दिले जाते अशी भांडी दररोज डिटर्जन्ट पावडरने धुवावी. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मृत झाला तर अशा पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा. पक्षी स्त्रावासोबत कोणत्याही स्थितीत संपर्क टाळावा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात पाणी व साबणाने स्वच्छ धुवा, परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन/ चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि हॅण्ड ग्लोव्हजचा नियमित वापर करावा.
पूर्ण शिजवलेल्या मांसाचाच खाण्यासाठी वापर करावा. आपल्या आसपास परिसरात तलाव असेल आणि त्या तलावामध्ये पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वन विभाग/ पशुसंर्धन विभागास कळविण्यात यावे व योग्य ती काळजी घ्यावी. कच्चे चिकन/कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवट शिजलेले चिकन/पक्षी, अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका/ पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नका.